वत्सासुराचा आणि बकासुराचा वधकृष्ण आणि इतर गुराखी वृंदावनाचा आनंद लुटत होते. ते पुष्कळ खेळ खेळत. त्यात त्यांच्या काही ना काही खोड्या चालूच असायच्या. काही गुराखी गोफणीतून नेम धरून दगड आणि गोट्या मारत. काहीजण अंगावर घोंगडी पांघरून गायी-बैलांसारखे चार पायांवर चालत; आणि एकमेकांच्या डोक्यांवर डोकी आपटून टक्कर घेत.

 काहीजण मधमाशांसारखा आवाज करत फिरत. काहीजण कोकिळांबरोबर कुहुकुहु गात असत. काहीजण हंसासारखे चालत. काहीजण करकोच्यांच्या पाठीवर बसत. काही गुराखी तर मोरांबरोबर नृत्य करीत.काही गुराखी पक्ष्यांच्या सावलीबरोबर शर्यत लावत; काहीजण झाडांच्या फांद्यांवर लोंबकळणार्‍या माकडांच्या शेपट्या ओढत. तर दुसरे काहीजण बेडकांसारख्या उड्या मारत फिरत. काहीजण कालिंदी नदीत पोहत असत.

कृष्ण कालिंदीच्या तीरावरील कदंब वृक्षावर चढून बसे आणि मधुर सुरांत बासरी वाजवी. एके दिवशी कृष्ण, बलराम आणि त्यांचे गुराखी मित्र वासरांना चरायला घेऊन गेले. ती वासरेसुद्धा वृंदावनात खूश होती. तेथील कोवळे, लुसलुशीत, हिरवेगार गवत काही आगळेच होते.त्या हिरव्यागार गवतावर वासरे मनसोक्त चरत होती. गुराखी मुले खेळण्यात दंग होती. तेवढ्यात अचानक कुठून तरी एक राक्षस तेथे वासराचे रूप घेऊन आला आणि त्या वासरांमध्ये हळूच मिसळला. त्या राक्षसाचे नाव होते वत्सासुर. वत्सासुर वासराच्या रूपात असला तरी कृष्णाला हे न समजणे, शक्यच नव्हते! वासराच्या रूपातील राक्षसाकडे पाहून कृष्णाने मंद स्मित केले. कृष्णाने बलरामाचे लक्ष त्या नव्या वासराकडे वेधले. त्यानंतर कृष्णाने त्या नव्या वासराकडे धाव घेतली. ते वासरू त्याच्यावर हल्ला करण्याच्याच बेतात होते.

पण त्यापूर्वीच कृष्णाने त्याचे मागचे पाय आणि शेपटी पकडून त्याला गरागरा फिरवले आणि हवेत उंच फेकून दिले. ते वासरू धपकन् खाली पडले व निष्प्राण झाले. सगळे गुराखी आनंदित झाले.एके दिवशी गुराखी मुले नेहमीप्रमाणे गाई-वासरांना चरायला घेऊन गेली. मनसोक्त चरून झाल्यावर ती निवांतपणे रवंथ करीत बसली. नंतर गुराखी मुले त्यांना पाणी पिण्यासाठी घेऊन गेले.

गाईवासरे पाणी पित होती. तेवढ्यात एखाद्या पर्वतासारखा एक अवाढव्य राक्षसी करकोचा आला आणि कृष्णावर हल्ला करण्यासाठी झेपावला. तो करकोच्याच्या वेषातील दैत्य होता! त्याचे नाव होते बकासुर. बकासुराने आपल्या भल्यामोठ्या, लांबरुंद चोचीमध्ये कृष्णाला पकडले…बकासुराला वाटले– ‘आपण कृष्णाला सहज गिळून टाकू– अगदीं माशासारखा.’ परंतु कृष्णाने त्याची चोच उघडून दोन्ही जबडे पेचकाटले, आणि बकासुराचे दोन तुकडे केले…! प्रत्येकाचे मन आनंदाने उचंबळून आले. देवांनी स्वर्गातून हर्षभराने पुष्पवृष्टी केली!
Click to Read an Interactive version of this story here