घोडा का खिंकाळला ? एकदा अकबर आणि बिरबल शिकार करण्यासाठी निघाले. सावजाच्या शोधात फिरता फिरता ते दाट जंगलात खूप आतपर्यंत गेले. त्या संपूर्ण दिवसभरात त्यांना कोणतीच शिकार मिळाली नाही.  शिकारीच्या शोधात इथे-तिथे भटकून दोघे खूप थकले होते. म्हणून ते एका झर्‍याजवळ थांबले. त्यांनी झर्‍यात हात, पाय आणि तोंड धुतले. मग त्यांनी आपापल्या घोड्यांना पाणी पाजले आणि आराम करण्यासाठी ते एका झाडाखाली आडवे झाले.संध्याकाळ झाली होती. हळूहळू काळोखही पडू लागला. म्हणून दोघे घरी परतायला तयार झाले. अकबर बिरबलला म्हणाला, ‘‘बिरबल, मला भूक लागली आहे. तुझ्याकडे काही खाण्यासाठी असेल तर दे.’’  बिरबल आपल्या घोड्याच्या खोगिरामधून चण्याची पुरचुंडी घेऊन आला. त्याने ती चण्याची पुरचुंडी अकबरला दिली. अकबरला तर खूप भूक लागली होती. त्यामुळे त्याने सर्व चणे फस्त केले. चणे खाऊन झाल्यावर दोघे आपापल्या घोड्यांवर स्वार होऊ लागले. बिरबल आपल्या घोड्यावर बसण्यासाठी रिकिबीत पाय ठेवणार, इतक्यात तो घोडा खिंकाळू लागला.बिरबलच्या घोड्याला विनाकारण खिंकाळताना पाहून अकबरला आश्चर्य वाटले. तो बिरबलला म्हणाला, ‘‘यावेळी तुझा घोडा का खिंकाळतो आहे?’’बिरबलला अकबरची मजा करावीशी वाटली. तो म्हणाला, ‘‘महाराज, माझ्या घोड्याचा खुराक तुम्ही खाल्लात. माझा घोडा आता मला विचारत आहे की, तू आता कोणावर स्वार होणार? माझ्यावर की बादशहावर?’’  बादशहाला ते चणे खाणे महागातच पडले. बिरबलचा चेष्टेखोर स्वभाव बादशहा ओळखून होता. त्यामुळे त्याने बिरबलला हसत हसत थोपटले. मग दोघेही घोड्यांवर स्वार होऊन परतीच्या मार्गाला लागले.
Click to Read an Interactive version of this story here