Raasleelaती शरद पौर्णिमेची रात्र होती. गोलाकार केशरी चंद्र रात्रीच्या आकाशाची शोभा वाढवीत होता. रुपेरी चंद्रप्रकाशात वृंदावन नाहत होते. कृष्णाने आपल्या खालच्या ओठांवर बासरी टेकवली आणि ती वाजवू लागला. कृष्णाच्या बासरीचे स्वर गोपिकांच्या कानावर पडले मात्र त्या सैरभैर होऊन धावत सुटल्या.काही गोपिका गायींचे दूध काढता काढता ते अर्ध्यावर टाकून तशाच धावल्या. काहीजणी चुलीवरचे रांधप तसेच विसरून घराबाहेर पडल्या. काही गोपिका स्तनपान करणार्या बाळांना बाजूला सारून धावत सुटल्या. काहीजणी नाहायचे अर्धवट टाकून निघाल्या. काहींनी गडबडीत डोळ्यांतले काजळ गालांवर माखले! काहींनी हातांतले कंकण पायांत चढवले, तर काहीजणींनी पायांतले पैंजण हातांत बांधले!बासरीच्या त्या मनमोहक सुरांनी सगळ्या गोपिका भुरळल्या होत्या. सगळ्या गोपिकांनी त्यांचे कामधाम टाकले. त्या संसार विसरल्या आणि कृष्णाला भेटायला धावल्या. कृष्णाच्या बासरीच्या त्या मोहक सुरांनी जणू सगळ्या गोपिकांना ओढून नेले! गोपिका यमुनातीरी गोळा झाल्या आणि पाहतात तर काय, कृष्ण बासरी वाजवीत होता त्याचा मोहक सावळा चेहरा चंद्रप्रकाशाने निथळत होता. त्याचा चेहरा तेजाने उजळला होता. जणू त्यावर केशराचा लेप चढवला होता!सगळ्या गोपिकांनी घरी परत जावे, म्हणून कृष्णाने त्यांना परोपरीने समजावले. पण कुणीच त्याचे ऐकले नाही. शेवटी कृष्णाने गोपिकांशी रासक्रीडा सुरू केली. त्यामुळे गोपिकांचे मन अभिमानाने फुलून गेले– ‘‘कृष्ण आमच्याशी खेळतो! आम्ही या पृथ्वीतलावरील सगळ्यात रूपवान आणि गुणवान स्त्रिया आहोत!’’ गोपिकांना झालेला हा गर्व भगवान श्रीकृष्णाला कळून चुकला. त्यांचे गर्वहरण करण्यासाठी स्वतः कृष्ण तत्क्षणी अदृश्य झाला!कृष्ण दिसेनासा झाला, हे गोपिकांच्या लक्षात आले आणि त्या वेड्यापिशा झाल्या. कृष्णाला त्या शोधू लागल्या. त्यांनी झाडा-झुडपांनाही विचारले– ‘‘अरे पिंपळा, हे वडा, अरे आम्रवृक्षा, हे शमीवृक्षा, तुम्ही कृष्णाला पाहिले का?’’ ‘‘अरे कदंबा, अगं जास्वंदी, तुम्ही तरी कृष्णाला पाहिले का?’’

‘‘अरे अशोका, अरे चंपका, अरे फणसा, अगं खिरणी, अगं तुळशी, दिसला का तुम्हांला कृष्ण कोठे?’’ ‘‘अगं सखे हरिणी, केसराच्या रंगछटेची मोगर्यााची माळ घातलेला कृष्ण तुम्ही पाहिला का कोठे?’’कृष्णाला शोधण्यासाठी गोपिकांनी इकडे-तिकडे धावाधाव केली. शेवटी त्या थकल्या आणि त्यांना रडू कोसळले. त्यांच्या गालांवरून अश्रू ओघळू लागले. त्यांची शोकाकुल स्थिती पाहून कृष्ण त्यांच्यासमोर प्रकट झाला! गोपिका एकदम भारावून गेल्या. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मंत्रमुग्ध गोपिकांनी कृष्णाला गराडा घातला. त्यांचे मन जणू म्हणत होते– ‘‘आपण रास खेळू या. कृष्णा, रास खेळू या!’’रास खेळायला अधीर झालेल्या गोपिका वर्तुळाकार उभ्या राहिल्या. जितक्या गोपिका तितकी कृष्णाने स्वतःची रूपे रचली. एकेका गोपिकेशी एकेक कृष्ण रास खेळू लागला. यमुनातीरी रात्रीचा शीतल वायू वाहत होता. त्याला मोगर्याीच्या आणि मंदाराच्या फुलांचा सुगंध होता. शरद ऋतूतील आकाशात केशरी चांदणे पसरले होते. रास पूर्ण रंगात आला होता.आकाशात देव-देवतांनीही रास पाहायला गर्दी केली. फुलांचा वर्षाव, कर्णभूषणे-कंकणांची किणकिण, पायीच्या पैंजणांची छुमछुम, छोट्या घंटांचा मधुर नाद. रास खेळण्यात गोपिका गुंग झाल्या होत्या! त्यांच्या केसांतील फुले अलगद गळून पडत होती. भान हरपलेल्या गोपिका जणू कृष्णमय होत चालल्या होत्या! धन्य त्या रास खेळणार्याो गोपिका! धन्य ते रास पाहणारे देवाधिदेव! सगळे वृंदावन धन्य झाले!
Click to Read an Interactive version of this story here